Belagavi

बेळगावात चालक-वाहकांसाठी हायटेक विश्रामगृहाचे लोकार्पण

Share

परिवहन मंडळाच्या चालक आणि वाहकांसाठी बेळगाव मध्यवर्ती बस स्थानकात सर्व सोयी-सुविधांनी युक्त विश्रामगृह उभारण्यात आले आहे. वायव्य कर्नाटक राज्य रस्ते वाहतूक मंडळाच्या (NWKRTC) माध्यमातून या नवनिर्मित विश्रामगृहाचे उद्घाटन मंडळाचे उपाध्यक्ष सुनील हणमण्णावर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी कर्तव्यावर आलेल्या चालक-वाहकांना गुलाब देऊन सन्मानपूर्वक स्वागत करण्यात आले.

उद्घाटन प्रसंगी बोलताना उपाध्यक्ष सुनील हणमण्णावर यांनी सांगितले की, माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची गंभीर दखल घेत ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. एकाच वेळी २० ते २५ कर्मचाऱ्यांना विश्रांती घेता येईल अशी सोय, गाद्या, पिण्याचे शुद्ध पाणी, स्वच्छतागृह आणि जेवणासाठी डायनिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. घरगुती वातावरणाप्रमाणे या सर्व मूलभूत सुविधा पुरवण्यात आल्या असून कर्मचाऱ्यांनी याचा योग्य वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले.

दिवस-रात्र सेवा बजावल्यानंतर विश्रांतीसाठी योग्य जागा नसल्याने त्रास होत होता. मात्र, केवळ ४ ते ५ दिवसांत हे हायटेक विश्रामगृह तयार करून दिल्याबद्दल चालक-वाहकांनी व्यवस्थापनाचे आभार मानले.

या वेळी बेळगाव विभागाचे नियंत्रक शशिधर मडीदेवरमठ यांच्यासह मंडळाचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

Tags: