Vijayapura

राजीनाम्यानंतर आमदार यशवंतरायगौडा पाटील विजापूरला दाखल; आज मौन, उद्या स्फोटक वक्तव्य करणार?

Share

मंत्रिपद न मिळाल्याने आपल्या आमदारकीचा राजीनामा दिलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यशवंतरायगौडा पाटील हे विजापूर येथे दाखल झाले. या वेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी कोणतेही वक्तव्य करण्यास स्पष्ट नकार दिला.

माध्यमांशी बोलण्यास नकार देत आमदार यशवंतरायगौडा पाटील यांनी, “उद्या विजापूर येथील शासकीय विश्रामगृहात सविस्तर पत्रकार परिषद घेऊन सर्व काही जाहीर करेन,” एवढीच संक्षिप्त माहिती दिली.

त्यांच्या या भूमिकेमुळे त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीसंदर्भात राजकीय वर्तुळात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. उद्याच्या पत्रकार परिषदेत ते आमदारकीचा दिलेला राजीनामा मागे घेणार, की आपल्या निर्णयाबाबत नवीन अटी समोर ठेवणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

याशिवाय, मंत्रिपदापासून वंचित राहिल्याबद्दल ते आपला असंतोष जाहीरपणे व्यक्त करणार का, विजापूर जिल्ह्यातील राजकीय घडामोडी तसेच मंत्री एम. बी. पाटील यांच्यासोबत असलेल्या राजकीय मतभेदांवर स्पष्ट बोलणार का, यावरही चर्चा रंगू लागली आहे.

सध्या तरी मौन बाळगलेल्या यशवंतरायगौडा पाटील यांची उद्याची पत्रकार परिषद केवळ विजापूर जिल्ह्यासाठीच नव्हे, तर राज्याच्या राजकारणालाही महत्त्वाचे वळण देण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या पुढील घोषणेकडे राजकीय वर्तुळासह सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे.

Tags: