काँग्रेस सरकारमध्ये स्थान न मिळाल्याने माजी मंत्री आणि आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या समर्थकांचा राग अनावर झाला आहे. बेळगाव येथील हिरेबागडेवाडी टोलनाक्याजवळ समर्थकांनी रस्ता रोको आंदोलन केल्याने राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली.

काँग्रेस सरकारमध्ये मंत्रिपद मिळवण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करणाऱ्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांना अखेर अपयश आले. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याच्या निषेधार्थ त्यांच्या समर्थकांनी बेळगावमध्ये रस्त्यावर उतरून तीव्र संताप व्यक्त केला.

बेळगावच्या हिरेबागडेवाडी टोलगेटजवळ समर्थकांनी राष्ट्रीय महामार्ग रोखून धरल्याने वाहनांची ये-जा पूर्णपणे बंद झाली आणि सर्वसामान्य नागरिकांचे हाल झाले. धरणे आंदोलनासाठी बसलेल्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस हाय command आणि राज्य नेत्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत आपला असंतोष व्यक्त केला.
हिरेबागडेवाडी भागातून यापूर्वी काँग्रेसचा कोणताही आमदार निवडून आला नव्हता. लक्ष्मी हेब्बाळकर निवडून आल्यानंतर या भागात मोठ्या प्रमाणावर विकासकामे झाली आहेत. त्यांचे कार्य पाहून सरकार आणि हायकमांड त्यांना नक्कीच मंत्रिपद देईल असा विश्वास असल्याने आम्ही आंदोलन केले नव्हते. मात्र, आज ग्रामीण भागावर अन्याय झाल्याचे स्पष्ट झाले आहे, असे दर्गा अज्जनवर यांनी सांगितले.
राहुल गांधी ग्रामीण भागाचा विकास झाला पाहिजे असे सांगतात, पण आज आमच्यावरच अन्याय झाला आहे. लक्ष्मी हेब्बाळकर यांना मंत्रिपद मिळेपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील, अन्यथा तीव्र लढा उभारू, असा इशारा दर्गा अज्जनवर यांनी दिला.


Recent Comments