बेळगावमधील टिळकवाडी येथील डिव्हाईन प्रॉव्हिडन्स कॉन्व्हेंट हायस्कूलच्या प्रांगणात ‘इन्सेन्डो २०२६’ ही भव्य आंतरशालेय स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली.


या स्पर्धेत शहरातील प्रमुख शाळांमधील शेकडो विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे प्रदर्शन करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. बेळगावातील टिळकवाडीच्या डिव्हाईन प्रॉव्हिडन्स कॉन्व्हेंट हायस्कूलमध्ये आज ‘इन्सेन्डो २०२६’ या भव्य आंतरशालेय स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. बेळगाव शहर आणि परिसरातील सुमारे २० शाळांमधील ५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी यात अत्यंत उत्साहाने भाग घेतला. वादविवाद, नृत्य व नाटक, कला, मास्टर अँड मिस, शार्क टँक, सरप्राईज इव्हेंट आणि फॅशन शो अशा एकूण ७ वेगवेगळ्या विभागांमध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या सर्जनशील प्रतिभेचे दर्शन घडवले. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, संघभावना आणि नेतृत्वगुण विकसित करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे मुख्याध्यापिकांनी सांगितले.

डिव्हाईन प्रॉव्हिडन्स शाळेच्या पीटीए (PTA) सदस्यांनी ‘इन्सेन्डो’ या गुणदर्शन कार्यक्रमाबद्दल आनंद व्यक्त केला. “दरवर्षी आयोजित होणाऱ्या या उपक्रमात यंदा २२ शाळांमधील ५०० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले आहेत. विविध स्पर्धांच्या माध्यमातून मुलांमधील कलागुणांना वाव देऊन त्यांच्या भविष्यातील विकासाला प्रोत्साहन देणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे,” असे त्यांनी सांगितले.

पीटीए सदस्य विनायक एल. जी. म्हणाले, “इन्सेन्डो हा आमच्या शाळेचा मुख्य वार्षिक उपक्रम आहे. विद्यार्थ्यांना त्यांची प्रतिभा, नवकल्पना आणि सर्वांगीण व्यक्तिमत्त्व मांडण्यासाठी हे एक उत्तम व्यासपीठ आहे. हा कार्यक्रम विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि माजी विद्यार्थ्यांना एकत्र आणून शिक्षण व संस्कृतीचा उत्सव साजरा करण्यास मदत करतो.” –



Recent Comments