बिदरमध्ये बेकायदेशीरपणे देशी पिस्तूल आणि शस्त्रास्त्रांची विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून ६.७३ लाख रुपये किमतीची पाच देशी पिस्तुले आणि इतर शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.

जिल्हा पोलीस अधीक्षक प्रदीप गुंटी यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, बिदर शहराच्या बाहेरील रिंगरोडजवळ दोघे जण पिस्तूल विक्री करत असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे विशेष पथकाने सापळा रचून कारवाई केली. या कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडील तीन बॅगमधून पाच देशी पिस्तुले, २६ जिवंत काडतुसे, १० रिकाम्या पुंगळ्या आणि पाच तलवारींसह गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे.

प्राथमिक चौकशीत आरोपींनी ही शस्त्रास्त्रे महाराष्ट्रातील नांदेड येथून खरेदी केल्याचे आणि ती अधिक किमतीत बिदरमध्ये विक्री करण्यासाठी आणल्याचे कबूल केले आहे. तसेच पिस्तुलांची चाचणी घेण्यासाठी त्यांनी १० राऊंड फायर केल्याचेही चौकशीत समोर आले आहे. याप्रकरणी एकूण चार आरोपींविरुद्ध आर्म्स ऍक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, अटक केलेल्या दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. उर्वरित आरोपींचा शोध आणि पुढील तपास सुरू आहे.
पोलीस अधीक्षक प्रदीप गुंटी यांनी या यशस्वी कामगिरीबद्दल कारवाईत सहभागी असलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. नागरिकांनी कोणत्याही बेकायदेशीर शस्त्रे, दारूगोळा किंवा अंमली पदार्थांची खरेदी, विक्री आणि वाहतूक यामध्ये सामील होऊ नये, असे आवाहन जिल्हा पोलीस विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
या पत्रकार परिषदेला अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत पुजारी, गुन्हे शाखेचे डीएसपी एन. डी. सन्नदी, डीवायएसपी दुदपीर मुल्ला, डीआर डीएसपी शरणप्पा, मार्केट पोलीस ठाण्याचे सीपीआय फालाक्षय्या आणि पीएसआय सय्यद तस्लीम उपस्थित होते.


Recent Comments