suicide

प्रेयसीच्या हत्येनंतर प्रियकराचीही गळफास घेऊन आत्महत्या

Share

बेळगाव जिल्ह्यात कुटुंबियांच्या त्रासाला कंटाळून प्रेमी युगुलाचा दुर्दैवी अंत झाला आहे. प्रेयसीची तिच्याच कुटुंबियांनी हत्या केल्यानंतर, तिच्या विरहातून प्रियकरानेही तिच्या वाढदिवशीच गळफास लावून आत्महत्या केली.

बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील नदीगुडकेतर येथील रहिवासी कृष्णा सहदेव पाटील (३०) आणि रायबाग तालुक्यातील हुब्बरवाडी येथील विवाहित महिला सत्तेव्वा संतोष हेळवी यांच्यात प्रेमसंबंध होते. काही दिवसांपूर्वी हे दोघेही घर सोडून निघून गेले होते, मात्र पोलिसांनी त्यांचा शोध घेऊन त्यांना परत आणले होते. त्यानंतर सत्तेव्वाच्या माहेरच्या लोकांनी तिला महाराष्ट्रातील अरग येथे नेऊन कृष्णासोबतचे संबंध तोडण्यासाठी तिच्यावर दबाव आणला. सत्तेव्वाने याला स्पष्ट नकार दिल्याने तिच्या माहेरच्या लोकांनीच तिची क्रूरपणे हत्या केली.

प्रेयसी बेपत्ता झाल्याने घाबरलेल्या कृष्णाने पोलिसांत तक्रार दाखल केली थी. या तक्रारीच्या आधारे यमकनमरडीचे सीपीआय जावेद मुशापुरे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी तपास चक्र फिरवून तीन आरोपींना अटक केली. हे हत्येचे प्रकरण महाराष्ट्रातील मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले आहे.

जिवापाड प्रेम करणाऱ्या सत्तेव्वाच्या हत्येच्या धक्क्यातून कृष्णा सावरू शकला नाही. ४ जून २०२६ रोजी मृत सत्तेव्वाचा वाढदिवस होता. नेमक्या याच दिवशी कृष्णाने नदीगुडकेतरमधील आपल्या राहत्या घरात दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. प्रेयसीच्या वाढदिवसाच्या दिवशीच प्रियकरानेही मृत्यूला कवेत घेतल्याने संपूर्ण तालुक्यात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी यमकनमरडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Tags: