बेळगाव जवळील हिंडलगा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या लक्ष्मी नगर येथील श्री महालक्ष्मी समाज मंदिरात यंदाही वार्षिक उत्सव अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. समाजातील अनेक अनिष्ट प्रथांना फाटा देत, सामाजिक उपक्रमांद्वारे हा उत्सव साजरा करून या देवस्थान समितीने समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे.

महालक्ष्मी मंदिराच्या वार्षिक उत्सवाचे यंदा ३३ वे वर्ष होते. उत्सवाच्या दिवशी पहाटेपासूनच मंदिरात विविध धार्मिक विधींना सुरुवात झाली. यामध्ये प्रामुख्याने श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले होते. उत्सवानिमित्त मंदिराला आकर्षक फुलांची आरास आणि नेत्रदीपक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. श्री महालक्ष्मी देवीची मूर्ती आकर्षक दागिन्यांनी आणि फुलांनी सजवण्यात आली होती.

सकाळी मंदिरातून पारंपरिक वाद्यांच्या गजरात भव्य पालखी सोहळ्याला सुरुवात झाली. संपूर्ण गावातून ही पालखी मिरवणूक काढण्यात आली. गावातील भाविकांनी ठीकठिकाणी पालखीचे जल्लोषात स्वागत केले. पालखी देवस्थानात परतल्यानंतर सुवासिनींसाठी ओटी भरण्याचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर देवस्थान पंच कमिटी, मान्यवर आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत सामूहिक आरती झाली.
या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे, या भागात हे अत्यंत जागृत देवस्थान मानले जाते, जिथे केवळ धार्मिकच नव्हे तर राष्ट्रीय सणही मोठ्या अभिमानाने साजरे केले जातात. उत्सवादरम्यान मांसाहार पूर्णपणे वर्ज्य असतो आणि सर्वांसाठी गोड जेवणाचा बेत आखला जातो. यंदाही महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, ज्याचा लाभ हजारो भाविकांनी घेतला. याशिवाय, सामाजिक बांधिलकी जपत ‘एस बी जी’ संस्थेच्या वतीने ग्रामस्थांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.
श्री महालक्ष्मी कल्चरल अँड सोशियल युनियन चॅरिटेबल ट्रस्टचे कार्याध्यक्ष दत्ताजीराव कानूरकर यांनी उत्सवाबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, “अनेक गावांमध्ये यात्रांचे स्वरूप वेगळे असते. कित्येक ठिकाणी आजही पशू बळी देणे किंवा आहेर स्वीकारणे यासारख्या प्रथा पाळल्या जातात. मात्र, लक्ष्मी नगर येथील श्री महालक्ष्मी समाज मंदिरात स्थापना झाल्यापासून आजतागायत अशा सर्व प्रथांना फाटा देण्यात आला आहे. आम्ही येथे केवळ धार्मिक उत्सव साजरा करत नाही, तर त्यासोबत विविध सामाजिक उपक्रमही राबवतो. हा एक शुद्ध सामाजिक आणि कौटुंबिक उत्सव आहे. या देवस्थानाचा हाच आदर्श इतर प्रत्येक गावाने घेणे गरजेचे आहे.”
वार्षिक उत्सवानिमित्त श्री महालक्ष्मी देवीची आकर्षक आरास लक्ष्मी कानूरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली होती. या संपूर्ण सोहळ्याला कृष्णा बाडीवाले, प्राजक्त केकरे, सुरेश पाटील, राजन टाकळकर, शिवाजी बाडीवाले, शंकर गर्डे, दिनकर गवस, किशोर उरणकर, श्रीकांत लोकरे, सच्चिदानंद चिकोर्डे आदींसह महिला मंडळाच्या पदाधिकारी, सदस्या आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments