राज्यात सत्तासंघर्षाच्या चर्चा सुरू असतानाच आता मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे वाहू लागले आहेत. मंत्रीपदासाठी इच्छुक असलेले वरिष्ठ आमदार हायकमांडची भेट घेण्यासाठी सज्ज झाले असून, उद्या मोठ्या संख्येने आमदार दिल्लीला रवाना होणार आहेत.

कर्नाटक राजकारणात मंत्रिमंडळ पुनर्रचना किंवा विस्ताराचा दबाव दिवसेंदिवस वाढत आहे. तीन-चार वेळा निवडून आलेल्या वरिष्ठ आमदारांनी आपल्यालाही मंत्रीपद मिळावे, अशी मागणी लावून धरली आहे. यापूर्वी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची भेट घेतल्यानंतर, त्यांनी हायकमांडचे लक्ष वेधून घेण्याची सूचना केल्याने ही दिल्लीवारी महत्त्वाची मानली जात आहे. “अधिवेशनादरम्यानच वरिष्ठ नेत्यांनी एकत्र येऊन हायकमांडची भेट घेण्याचा निर्णय घेतला होता,” असे टी.बी. जयचंद्र यांनी म्हटले.
बागलकोट आणि दावणगेरे पोटनिवडणुका पार पडल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. उद्या साधारण ३८ ते ४० आमदार दिल्लीला जाण्याची शक्यता असून ते एआयसीसी अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेऊन मंत्रीपदासाठी साकडे घालणार आहेत. या घडामोडींमुळे राज्य मंत्रिमंडळात बदलाचे वारे वाहू लागले असून कोणाची वर्णी लागणार, याची उत्सुकता वाढली आहे.


Recent Comments