हुबळीमध्ये सुरू असलेल्या आयपीएल बेटिंगच्या अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून एका आरोपीला अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ५.५ लाख रुपयांची रोकड जप्त केली असून ही मोहीम जुनी हुबळी पोलिसांनी फत्ते केली.


हुबळीमधील आनंद नगर रोड परिसरात आयपीएल सामन्यांवर बेटिंग सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून धाड टाकली. यावेळी कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील सामन्यावर सुरू असलेल्या सट्ट्याप्रकरणी दीपक बद्दी याला अटक करण्यात आली. या कारवाई दरम्यान आणखी एक आरोपी पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
जुनी हुबळी पोलीस ठाण्याचे निरीक्षक मल्लिकार्जुन सिंधूर यांच्या नेतृत्वाखाली पीएसआय बी. सातन्नवर, विश्वनाथ आलमट्टी आणि गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
या प्रकरणाबाबत हुबळी-धारवाड पोलीस आयुक्त एन. शशकुमार यांनी माहिती दिली. हळे हुबळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सखोल तपास सुरू असल्याचे एन. शशकुमार यांनी म्हटले आहे. शहरात आतापर्यंत अशा प्रकारचे ११ गुन्हे दाखल झाले असून बेटिंगसारख्या बेकायदेशीर कृत्यांवर पोलिसांची करडी नजर असल्याचेही एन. शशीकुमार यांनी नमूद केले.


Recent Comments