देशाच्या विकासामध्ये सिद्धगंगा मठाचे योगदान अत्यंत मोलाचे असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले आहे. तुमकूर येथील सिद्धगंगा मठात डॉ. शिवकुमार महास्वामीजींच्या जयंती आणि गुरुवंदना महोत्सवात त्या बोलत होत्या.

सिद्धगंगा मठात आयोजित कार्यक्रमात बोलताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की, शिवकुमार स्वामीजींसारखी महान व्यक्तिमत्त्वे आपल्या समाजाचे आणि राष्ट्राच्या आत्मस्वरूपाचे प्रतिनिधित्व करतात. २०१९ मध्ये त्यांचे देहावसान झाले असले, तरी त्यांची आध्यात्मिकता समाज आणि राष्ट्राला सदैव प्रेरणा देत राहील. त्यांनी आपल्या आध्यात्मिक कार्यातून मानवजातीसाठी मोठे योगदान दिले आहे. गरीब आणि मागासवर्गीयांच्या सेवेसाठी समर्पित असलेले त्यांचे जीवन हे सेवेतून अध्यात्म जोपासण्याचे उत्तम उदाहरण आहे, असे राष्ट्रपती मुर्मू यांनी स्पष्ट केले. मठाकडून सुरू असलेल्या शैक्षणिक आणि आरोग्य सेवांचाही त्यांनी या वेळी गौरव केला.

वीरशैव-लिंगायत मठांनी समाजासाठी दिलेली सेवा अद्वितीय असून त्यामध्ये सिद्धगंगा मठ अग्रस्थानी आहे. शिवकुमार स्वामीजींनी अनेक दशके एकाच ठिकाणी राहून सातत्याने जनसेवेचे कार्य केले. त्यांचे जीवन म्हणजे एक चमत्कार आणि विस्मयच आहे, असे उद्गार सिद्धलिंग स्वामीजी यांनी या वेळी काढले. स्वामीजींच्या जीवनात गरीब मुले आणि मुलींना शिक्षण देणे ही दोन मुख्य उद्दिष्टे होती, असेही त्यांनी नमूद केले.
या प्रसंगी कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनीही स्वामीजींच्या कार्याचे कौतुक केले. मानवता कल्याणासाठी शिवकुमार स्वामीजींनी केलेले कार्य अनन्यसाधारण आहे. ‘सबका साथ, सबका विकास’ या भावनेतून त्यांनी समाजाची सेवा केली, असे राज्यपाल गेहलोत यांनी सांगितले.


Recent Comments