राज्याची आर्थिक स्थिती खालावल्याच्या विरोधी पक्षांच्या टीकेला मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दावणगेरे येथे चोख प्रत्युत्तर दिले. राज्याची तिजोरी सुरक्षित असून भाजप राजकीय फायद्यासाठी जाणीवपूर्वक खोटी माहिती पसरवत असल्याचे त्यांनी सांगितले.

दावणगेरेमध्ये माध्यमांशी बोलताना सिद्धरामय्या यांनी स्पष्ट केले की, कर्नाटकची आर्थिक स्थिती भक्कम आहे आणि भाजपचे दावे धादांत खोटे आहेत. केंद्रात काँग्रेसचे सरकार असताना गॅस, पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होते, मात्र मोदी सरकारच्या काळात त्यात मोठी वाढ झाली आहे. भाजपच्या ताटात उंदीर मेला आहे आणि ते दुसऱ्याच्या ताटात माशी शोधत आहेत, असा टोला त्यांनी लगावला. शेजारील राज्यांच्या तुलनेत आपल्या राज्यात इंधनाचे दर कमी आहेत. प्रत्येक कुटुंबाला १५ लाख रुपये देण्याचे आणि दरवर्षी २ कोटी रोजगार देण्याचे आश्वासन भाजपने पाळले का, असा सवाल सिद्धरामय्या यांनी केला. तसेच कर्नाटकात ४ वर्षे सत्ता असताना भाजपने दावणगेरेसाठी काय केले, अशी विचारणाही सिद्धरामय्या यांनी केली.
विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी मुख्यमंत्र्यांच्या मुलाच्या उमेदवारीवरून केलेल्या टीकेला उत्तर देताना सिद्धरामय्या यांनी भाजपला आरसा दाखवला. काँग्रेसमधून गेलेल्या नेत्याला आसामचे मुख्यमंत्री केले आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. येडियुरप्पा आणि त्यांची मुले किंवा देवेगौडा आणि त्यांची मुले राजकारणात नाहीत का, असा प्रश्न सिद्धरामय्या यांनी उपस्थित केला. घराणेशाहीच्या मुद्द्यावरून भाजपने आधी स्वतःच्या पक्षात डोकावून पाहावे, असे सिद्धरामय्या यांनी स्पष्ट केले.


Recent Comments