राज्य सरकारच्या पंच गॅरंटी योजनांमुळे महिला खऱ्या अर्थाने सक्षम होत आहेत. महिलांनी स्वाभिमानाने जगावे या उद्देशानेच ‘गृहलक्ष्मी’ आणि ‘शक्ती’ सारख्या योजना राबवल्या जात आहेत, असे प्रतिपादन महिला आणि बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केले.

बेंगळुरू येथे काँग्रेस नेते लग्गेरे नारायणस्वामी यांच्या वाढदिवसानिमित्त २०८ गर्भवती महिलांसाठी सामूहिक डोहाळे जेवण आणि आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याचे उद्घाटन करताना महिला आणि बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी राज्य सरकारच्या पंच गॅरंटी योजनांमुळे महिलांचे खऱ्या अर्थाने सक्षमीकरण होत असल्याचे प्रतिपादन केले. माता आणि बालकांच्या आरोग्याची जबाबदारी सरकार उचलत असून, लग्गेरे नारायणस्वामी यांच्यासारख्या नेत्यांनी सामाजिक तळमळीतून असे उपक्रम राबवणे कौतुकास्पद असल्याचे मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी नमूद केले.

या सोहळ्याप्रसंगी चित्रदुर्ग मडीवाळ माचिदेव गुरुपीठाचे जगद्गुरु श्री मडीवाळ माचिदेव स्वामीजी, काँग्रेस नेत्या कुसुमा हनुमंतरायप्पा, लगगेरे नारायणस्वामी, मंजुळा नारायणस्वामी, अभिनेत्री अश्विनी गौडा, आशा सुरेश, रूपा लिंगेश आणि मंजुळा मंजुनाथ बाबू यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.



Recent Comments