हुबळीमध्ये सहा लाख रुपयांची लाच स्वीकारताना वाणिज्य कर विभागाचे उपायुक्त भरतकुमार हेगडे यांना लोकायुक्तांनी सापळा रचून अटक केली आहे. एका व्यापाऱ्याविरुद्धचे जुने प्रकरण निकाली काढण्यासाठी त्यांनी या रकमेची मागणी केली होती.
अंकोला येथील विश्वजित नायक यांनी २०१९ मध्ये आठ टीप्पर खरेदी केले होते. या व्यवहारात त्यांना ६० लाख रुपयांचे इनपुट टॅक्स क्रेडिट मिळाले होते, ज्यापैकी ३४ लाखांचा लाभ त्यांनी घेतला होता. मात्र, हा लाभ नियमबाह्य असल्याचे सांगत वाणिज्य कर विभागाने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली होती.
या प्रकरणाच्या चौकशीसाठी भरतकुमार हेगडे यांनी नायक यांना आतापर्यंत चार वेळा पाचारण केले होते. आज पाचव्या सुनावणीसाठी येताना हे प्रकरण पूर्णपणे बंद करण्याच्या बदल्यात त्यांनी पैशांची मागणी केली होती. त्यानुसार सहा लाख रुपये स्वीकारताना लोकयुक्तांनी त्यांना ताब्यात घेतले.
बेंगळुरू लोकयुक्तांचे एसपी शिवप्रकाश देवराज, डीवायएसपी मल्लिकार्जुन चुक्की, प्रदीप कुमार आणि निरीक्षक राजू यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही यशस्वी कारवाई केली. अटकेनंतर संबंधित अधिकाऱ्याची कसून चौकशी करण्यात येत आहे.
प्रकरण मिटवण्यासाठी पैसे घेऊन येण्यास भरतकुमार हेगडे यांनी सांगितले होते, अशी माहिती विश्वजित नायक यांनी दिली. या कारवाईमुळे हुबळीमधील प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.


Recent Comments