State

पोलीस दलात शिस्त आणि मानवता अत्यंत महत्त्वाची : मुख्यमंत्री

Share

पोलीस सेवेमध्ये शिस्त, संयम आणि प्रामाणिकपणा जपून दलित, शोषित व महिलांचे संरक्षण करणे हे पोलिसांचे मुख्य कर्तव्य आहे. न्यायदानामध्ये पोलिसांनी कोणत्याही दबावाखाली तडजोड करू नये, असे प्रतिपादन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केले.

म्हैसूरू येथील ४६ व्या तुकडीच्या पोलीस उपनिरीक्षक प्रशिक्षणार्थींच्या दीक्षान्त संचलन सोहळ्यात मुख्यमंत्र्यांनी परेडची पाहणी करून मानवंदना स्वीकारली. महात्मा गांधींच्या स्वप्नातील निर्भय समाज घडवण्यासाठी पोलिसांनी कायद्याचे रक्षक म्हणून काम करावे आणि सामाजिक समानता प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असा सल्ला मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिला.

प्रशिक्षणातील शिस्त आयुष्यभर जपण्याचे आवाहन करत मुख्यमंत्र्यांनी रिक्त पदे भरण्याची ग्वाही दिली. गेल्या तीन वर्षांत ४,९११ पदे भरली असून, आगामी काळात आणखी ८,००० पदांची भरती केली जाईल. अमली पदार्थमुक्त समाज घडवण्यासाठी पोलिसांनी आपल्या कार्यक्षेत्रात कठोर पावले उचलावीत, असे निर्देश मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिले.

या सोहळ्यात उत्कृष्ट सेवेबद्दल मुख्यमंत्री पदक प्रदान करण्यात आले. यामध्ये मार्केट उपविभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त संतोष दयानंद सत्यनायक, खानापूरचे कॉन्स्टेबल जगदीश काद्रोळी, विजापूरचे डीएसपी तुळजप्पा सुल्पी, बाळप्पा नंदगावी, श्रीकांत कांबळे, रामनगौडा बिरादार, चिदानंद गिडगंची यांच्यासह बाहुबली अनगाले आणि राघवेंद्र हवालदार यांचा सन्मान मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते करण्यात आला.

Tags: