राज्यात प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तातडीने घेण्याची मागणी विधान परिषदेचे सदस्य हनुमंत निराणी यांनी केली आहे. या निवडणुकांमध्ये बॅलेट पेपरऐवजी ईव्हीएम तंत्रज्ञानाचा वापर करावा, असा महत्त्वाचा सल्ला त्यांनी सरकारला दिला आहे.
विधान परिषदेत कर्नाटक ग्रामस्वराज आणि पंचायत राज २०२६ च्या विधेयक क्रमांक ३ मध्ये सुधारणा करून ते मंजूर करण्याची मागणी हनुमंत निराणी यांनी केली. राजीव गांधी यांच्या काळातच ईव्हीएमचा विचार सुरू झाला होता. ईव्हीएमच्या वापरामुळे मनुष्यबळ कमी लागते, मतमोजणी जलद होते आणि आर्थिकदृष्ट्याही ते फायदेशीर ठरते. त्यामुळे सध्याच्या काळात बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याचा निर्णय योग्य नाही, असे मत हनुमंत निराणी यांनी व्यक्त केले.
ईव्हीएमबाबत काही तांत्रिक त्रुटी असल्यास त्या प्रायोगिक तत्त्वावर दुरुस्त केल्या पाहिजेत. गेल्या आठ वर्षांपासून जिल्हा आणि तालुका पंचायतींच्या निवडणुका झालेल्या नाहीत. यामुळे प्रशासकीय विकेंद्रीकरण करून सुशासन देण्याच्या प्रक्रियेला खीळ बसली आहे. त्यामुळे सरकारने तातडीने जिल्हा आणि तालुका पंचायतींच्या निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी हनुमंत निराणी यांनी केली.


Recent Comments