बेंगळुरू येथील रवींद्र कलाक्षेत्रात आयोजित आंतरराष्ट्रीय महिला दिन कार्यक्रमात मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर बोलत होत्या. स्त्री जर स्वाभिमानाने जगली, तर तिची मुले आणि संपूर्ण कुटुंब धैर्याने उभे राहते, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

महिला अल्प पैशातही उत्तम संसार करू शकते आणि स्त्रीने स्वतःचे आरोग्य जपल्यास घर नंदनवन होते, असे लक्ष्मी हेब्बाळकर यांनी नमूद केले. आजच्या काळात पुरुषांची विचारसरणी बदलली असून, प्रत्येक यशस्वी महिलेच्या मागे पुरुष खंबीरपणे उभे राहत असल्याचे त्यांनी सांगितले.

क्रीडा क्षेत्रातील महिलांच्या प्रगतीचा गौरव करताना त्यांनी महिला क्रिकेट संघाचे उदाहरण दिले. अंध महिला विश्वचषकातील विजेत्या कर्नाटकच्या तीन खेळाडूंना प्रत्येकी १० लाख रुपयांचे बक्षीस आणि नोकरीचे आश्वासन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिले असल्याची माहिती लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली.

भारतीय संस्कृतीत महिलांना मोठे स्थान असून त्यांच्यातील संयम आणि चाತುर्य अद्वितीय असते, असे त्यांनी सांगितले. मी स्वतः दोन वेळा निवडणुकीत पराभूत झाले, तरीही खचून न जाता अहोरात्र कष्ट केले आणि आज मंत्रिमंडळातील एकमेव महिला मंत्री म्हणून लोकसेवा करत असल्याचे लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आवर्जून सांगितले.

गृहलक्ष्मी योजनेबाबत भाजप कडून होणाऱ्या आरोपांना उत्तर देताना त्या म्हणाल्या की, तांत्रिक कारणास्तव काही महिन्यांचा निधी रखडला आहे. जर ५ हजार कोटींचा घोटाळा झाला असता, तर केंद्राची ‘ईडी’ आज माझ्या दाराबाहेर असती, अशा शब्दांत लक्ष्मी हेब्बाळकर यांनी विरोधकांचा समाचार घेतला.

या कार्यक्रमात कित्तूर राणी चन्नम्मा पुरस्कार आणि उत्कृष्ट स्त्रीशक्ती गटांचा सन्मान करण्यात आला. यावेळी कर्नाटक राज्य महिला विकास महामंडळाच्या अध्यक्षा पदमवती, बाल विकास अकादमीचे अध्यक्ष अडीवेश इटगी, सचिव डॉ. शामला इक्बाल आणि इतर मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments