बागलकोट विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस उमेदवार म्हणून उमेश मेटी यांनी गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी उपस्थित असलेल्या मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भाजपच्या राजकारणावर सडकून टीका करत काँग्रेसच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला.
दिवंगत एच.वाय. मेटी यांच्या अकाली निधनामुळे ही पोटनिवडणूक ओढवली आहे. मतदारसंघातील जनतेची मते जाणून घेतल्यानंतर आणि मेटी कुटुंबाला न्याय देण्याच्या उद्देशानेच उमेश मेटी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. येथे घराणेशाहीपेक्षा जनतेच्या भावना आणि मेटी यांच्याबद्दल असलेल्या आदराला प्राधान्य देण्यात आले असल्याचे सिद्धरामय्या यांनी सांगितले.
काँग्रेस सरकार आपल्या आश्वासनांना जागणारे सरकार असून वर्षभरात पाचही गॅरंटी योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली आहे. गरिबांच्या कल्याणासाठी १.२० लाख कोटी रुपये खर्च करण्यात आले असून सिंचन प्रकल्प आणि शेतकरी भरपाईसाठी सरकार कटिबद्ध आहे. मेटी यांच्या प्रयत्नांमुळेच बागलकोटमध्ये मेडिकल कॉलेजची पायाभरणी झाली असून त्यांचा वारसा उमेश मेटी पुढे चालवतील अशी खात्री सिद्धरामय्या यांनी व्यक्त केली.
भाजपचे राजकारण केवळ खोटेपणावर आधारलेले असून त्यांना विकासाशी काहीही देणेघेणे नाही. मुस्लिम समुदायातील नाराजीबद्दल चर्चा करून त्यांना योग्य सन्मान दिला जाईल, मात्र काँग्रेस नेहमीच सामाजिक न्यायाला बांधील राहिली आहे. आमचे सरकार ‘डबल स्टिअरिंग’ असल्याचे म्हणणारे स्वतः निवडणुकीत पराभूत होऊन घरी बसले आहेत, अशा शब्दांत सिद्धरामय्या यांनी भाजप नेत्यांचा समाचार घेतला.


Recent Comments