Belagavi

सामान्य कार्यकर्ती ते कॅबिनेट मंत्री असा माझा संघर्ष : लक्ष्मी हेब्बाळकर

Share

मी काँग्रेस पक्षामध्ये एक सामान्य कार्यकर्ती म्हणून कामाला सुरुवात केली. अनेक चढ-उतार अनुभवल्यानंतर आज मी मंत्रीपदापर्यंत पोहोचले आहे. महिलांनी मनावर घेतले तर त्या काहीही साध्य करू शकतात, याचे मी जिवंत उदाहरण आहे, असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केले.

उद्यमबाग येथील फाऊंड्री क्लस्टर ऑडिटोरियममध्ये शुक्रवारी आयोजित महिला मेळाव्यात लक्ष्मी हेब्बाळकर बोलत होत्या. १९९८ मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर केवळ संघर्ष करण्याच्या वृत्तीमुळेच मी इथपर्यंत पोहोचू शकले, असे त्यांनी नमूद केले. राजकारण स्त्रियांसाठी वाटते तितके सोपे नाही. जिल्हा पंचायत, बेळगाव महानगरपालिका आणि २००९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी मी तिकीट मागितले होते, पण मला ते मिळाले नाही. मी हे आव्हान म्हणून स्वीकारले आणि स्वतःला सिद्ध केले. खासदार होणे हे माझे आजही मोठे स्वप्न असल्याचे लक्ष्मी हेब्बाळकर यांनी यावेळी सांगितले.

२०१३ मध्ये बेळगाव जिल्हा काँग्रेस अध्यक्ष असताना पक्ष बांधणी केल्यामुळे मला बेळगाव ग्रामीणमधून तिकीट मिळाले. मी मुळची खानापूरची असल्याने मला प्रचारात म्हणावा तसा पाठिंबा मिळाला नाही आणि अल्प मतांनी माझा पराभव झाला. २०१४ मध्ये लोकसभेची संधी मिळाली, पण मोदी लाटेत पराभव स्वीकारावा लागला. मात्र, खचून न जाता मी जनसंपर्क कायम ठेवला आणि २०१८ मध्ये ५२ हजार मतांच्या फरकाने ऐतिहासिक विजय मिळवला, असे लक्ष्मी हेब्बाळकर यांनी स्पष्ट केले.

जनतेच्या समस्यांना मी नेहमीच प्राधान्य दिले आहे. अभ्यास करूनच मी कोणत्याही विषयावर बोलते. जर मी राजकारणात आले नसते, तर नक्कीच डॉक्टर झाले असते, अशी मिश्किल टिप्पणीही लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केली.

या प्रसंगी रवींद्र एनर्जी लिमिटेडच्या विद्या मुरकुंबी , पट्टेद फर्टिलिटी अँड रिसर्च सेंटरच्या संचालक डॉ. शोभना पट्टेद, सेंट्राकेअर हॉस्पिटलच्या वैद्यकीय संचालक डॉ. नीता देशपांडे, डॉ. हिता एम. हेब्बाळकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होत्या.

Tags: