हुबळीमधील उणकल येथील महालक्ष्मी लेआउटमध्ये रील बनवण्याच्या नादात भीषण अपघात झाला असून, यामध्ये एका १५ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. विद्यानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, उणकल-तारीहाळ मार्गावरील महालक्ष्मी लेआउटमध्ये आज दुपारी ३ च्या सुमारास भाजप नेते संगळद यांचा मुलगा नमिश आणि त्याचे मित्र रील बनवण्यासाठी जमले होते. रीलच्या चित्रीकरणासाठी एक ऑडी कार आणि ओला इलेक्ट्रिक बाईकचा वापर केला जात होता. ऑडी कार चालवणारा दुसरा अल्पवयीन मुलगा साधारण १५० किमी प्रति तास या वेगाने गाडी चालवत होता. समोरून नमिश बाईकवरून येत असतानाचा सीन चित्रित केला जात होता, मात्र कारचा वेग प्रचंड असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार नमिशच्या दुचाकीवर जोरात धडकली. या धडकेत नमिश १० फूट दूर फेकला गेला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त शशिकुमार आणि डीसीपी रवीश यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. नमिशचा मृतदेह शवविच्छेदनासाठी किम्स रुग्णालयात पाठवण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
या भीषण घटनेनंतर पोलीस आयुक्त शशिकुमार यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. रील बनवण्याच्या नादात निष्पाप मुलाचा जीव गेला असून, अल्पवयीन मुलांच्या हातात महागड्या कार आणि बाईक देणाऱ्या पालकांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा शशिकुमार यांनी दिला आहे.


Recent Comments