दावणगेरे दक्षिण आणि बागलकोट विधानसभा पोटनिवडणूक काँग्रेससाठी प्रतिष्ठेची असून विजयाचेच आमचे मुख्य उद्दिष्ट आहे, असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केले.
दावणगेरे दक्षिण पोटनिवडणुकीच्या संदर्भात आयोजित देखरेख समितीच्या बैठकीनंतर त्या प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. या बैठकीत उमेदवारीसाठी ८ नावांवर चर्चा झाली असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि २०२८ ची विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कामाला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. उमेदवारांच्या निवडीबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि हायमांड चर्चा करून अंतिम निर्णय घेतील, असे लक्ष्मी हेब्बाळकर यांनी स्पष्ट केले.
निवडणूक लढवण्यासाठी तिकीट मागणे हा प्रत्येकाचा अधिकार असला, तरी हायमांडचा निर्णय सर्वांना बंधनकारक असेल. तिकीट जाहीर झाल्यानंतर सर्व मतभेद मिटवून सर्वांना विश्वासात घेतले जाईल आणि पक्ष एकजुटीने निवडणूक लढवेल, अशी प्रतिक्रिया लक्ष्मी हेब्बाळकर यांनी व्यक्त केली.


Recent Comments