बेळगावात ४० वर्षांपासून मोठा उद्योग न आल्याने तरुणांना स्थलांतर करावे लागत असून, येथे आयटी पार्क उभारण्याची मागणी आमदार अभय पाटील यांनी विधानसभेत केली. यावर सरकारने बेळगावमध्ये लवकरच उद्योजकांची बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे.
बेळगावमध्ये गेल्या चार दशकांपासून एकही मोठा उद्योग न आल्याने येथील सुशिक्षित तरुणांना रोजगारासाठी इतर शहरांकडे धाव घ्यावी लागत आहे. ही औद्योगिक पोकळी भरून काढण्यासाठी बेळगावमध्ये आयटी पार्क आणि बड्या उद्योगांची निर्मिती करण्याची मागणी आमदार अभय पाटील यांनी विधानसभेत केली. बेळगावमध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान आयटीबीपी केंद्रासंदर्भात घोषणा करण्यात आली होती. या घोषणेनंतर अनेक उद्योजकांनी बेळगावमध्ये गुंतवणूक करण्याबाबत स्वारस्य दाखवले आहे. बेळगाव हा सीमाभाग असल्याने येथे उद्योगांची मोठी कमतरता असल्याचे आमदार अभय पाटील यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.
बेळगावच्या औद्योगिक इतिहासावर प्रकाश टाकताना आमदार अभय पाटील यांनी सांगितले की, सुमारे ४० वर्षांपूर्वी याठिकाणी ‘इंडाल’ कंपनी आली होती. मात्र, त्यानंतर आजतागायत एकाही मोठ्या उद्योगाची स्थापना बेळगावमध्ये झालेली नाही. उद्योगांच्या या अभावामुळे बेळगावमधील तरुण नोकरीच्या शोधात पुणे, बेंगळुरू आणि हैदराबाद सारख्या शहरांमध्ये जात आहेत. बेळगाव शहर आणि जिल्हा उद्योगांपासून वंचित राहिला असून ‘बियॉन्ड बेंगळुरू’ हे धोरण केवळ हुबळी-धारवाडपर्यंतच मर्यादित राहू नये, अशी अपेक्षा आमदार अभय पाटील यांनी व्यक्त केली. कलामंदिर येथे झालेल्या ‘कर्नाटक डिजिटल इकॉनॉमिक मिशन’च्या उपक्रमाचे स्वागत करत आमदार अभय पाटील यांनी बेळगाव महानगरपालिका आणि संबंधित विभागाने बेळगावमध्ये उद्योजकांची एक विशेष सभा आयोजित करावी, अशी सूचना मांडली.
आमदार अभय पाटील यांच्या प्रश्नाला उत्तर देताना ग्रामविकास, पंचायत राज मंत्री प्रियांक खर्गे यांनी बेळगावच्या औद्योगिक प्रगतीसाठी राज्य सरकार कटिबद्ध असून लवकरच शहरात आयटी आणि सेमीकंडक्टर पार्क साकारण्यात येईल, अशी ग्वाही दिली. या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या जमिनीच्या हस्तांतरणाबाबत संरक्षण मंत्रालयाशी पत्रव्यवहार सुरू असून, टिळकवाडी येथील कलामंदिर इमारतीत जागतिक तंत्रज्ञान केंद्र उभारण्याचे कामही प्रगतीपथावर आहे. या उपक्रमांमुळे बेळगाव हे राज्याचे प्रमुख तंत्रज्ञान केंद्र म्हणून नावारूपास येईल आणि स्थानिक तरुणांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, अशी माहिती प्रियांक खर्गे यांनी दिली.
या प्रस्तावित प्रकल्पांमुळे बेळगाव एक प्रमुख तंत्रज्ञान केंद्र म्हणून स्थापित होईल आणि तरुणांसाठी रोजगाराच्या महत्त्वपूर्ण संधी निर्माण होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


Recent Comments