State

बीम्समधील रिक्त पदांचा प्रश्न विधान परिषदेत गाजला

Share

बीम्समधील कर्मचाऱ्यांची कमतरता आणि मूलभूत सोयीसुविधांच्या अभावाचे पडसाद विधान परिषदेत उमटले. सदस्य नागराज एम. यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. शरणप्रकाश पाटील यांनी रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया लवकरच राबवली जाईल, अशी ग्वाही दिली.

विधान परिषद सदस्य नागराज एम. यांनी बीम्सची स्थिती मांडताना सांगितले की, या रुग्णालयात विजापूर, बागलकोट आणि शेजारील महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातूनही रुग्ण उपचारासाठी येतात. दररोज सुमारे २ हजार बाह्यरुग्ण येथे येतात, मात्र रुग्णालयात ४० टक्के कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. गेल्या वेळी वीज पुरवठा खंडित झाला होता आणि सौर ऊर्जा यंत्रणाही काम करत नाहीये. उपकरणांची देखभाल आणि इतर समस्या तातडीने सोडवण्याची गरज असून स्थानिक पातळीवर चौकशी करून भ्रष्टाचार रोखावा, अशी मागणी नागराज एम. यांनी केली.

यावर बोलताना वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. शरणप्रकाश पाटील यांनी माहिती दिली की, बीम्समध्ये ७ सहप्राध्यापक, १७ सहाय्यक प्राध्यापक आणि ४४ वरिष्ठ निवासी डॉक्टरांची पदे रिक्त आहेत. रोस्टर पद्धतीनुसार ही भरती प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाईल. वीज समस्येसाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध असून उपकरणांच्या देखभालीसाठी आवश्यक पावले उचलली आहेत. सध्या २३८ कर्मचारी सेवेत असून केवळ ६८ पदे रिक्त आहेत. सुपर स्पेशालिटी विभागासाठी देखील भरती केली जात आहे. तक्रारी प्राप्त झाल्यास निश्चितपणे चौकशी केली जाईल, असे डॉ. शरणप्रकाश पाटील यांनी स्पष्ट केले.

या चर्चेदरम्यान नागराज एम. यांनी औषधांच्या तुटवड्याचा मुद्दाही उपस्थित केला. या विषयावर सविस्तर चर्चेसाठी अर्धा तास वेळ देण्याची मागणी त्यांनी केली. यावर उत्तर देताना मंत्री डॉ. शरणप्रकाश पाटील यांनी सांगितले की, जर रुग्णांना औषधे बाहेरून विकत आणायला लावली जात असतील, तर संबंधित दोषींवर कडक कारवाई केली जाईल.

Tags: