“माझ्या मुलाचा सांभाळ करा” या मुख्यमंत्री सिद्धरामय्यांच्या विधानावर विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी तीव्र आक्षेप नोंदवला असून, मुख्यमंत्र्यांनी या विधानाद्वारे डॉ. बी. आर. आंबेडकरांच्या संविधानाला हरताळ फासला असल्याची टीका केली आहे.

बेंगळुरू येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना आर. अशोक म्हणाले की, “मुख्यमंत्री सिद्धरामय्या स्वतःला समाजवादी म्हणवून घेतात आणि आपण घराणेशाहीच्या विरोधात असल्याचे सांगतात. मात्र, आता ते आपल्या मुलाचा सांभाळ करण्याचे आवाहन जनतेला करत आहेत. आज ते मुलासाठी सांगत आहेत, उद्या नातवाचा सांभाळ करा असे म्हणतील. पूर्वीच्या काळी राजेशाही असायची, जिथे राजानंतर युवराजाचा अभिषेक केला जायचा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून ही पद्धत मोडीत काढून लोकशाही व्यवस्था आणली. मात्र, मुख्यमंत्र्यांचे हे विधान लोकशाही मूल्यांना तिलांजली देणारे आहे.”
पुढे बोलताना अशोक म्हणाले की, “राजकारणात जनतेच्या मताने निवडून येऊन नेतृत्व सिद्ध करायचे असते. ते सोडून ‘माझ्या मुलाला सांभाळून घ्या’ असे सांगणे म्हणजे आंबेडकरांच्या विचारधारेचा आणि संविधानाचा अवमान करण्यासारखे आहे. मुख्यमंत्र्यांची ही वृत्ती लोकशाहीसाठी घातक आहे.”


Recent Comments