State

विधानसभेत जलजीवन मिशनमधील तांत्रिक त्रुटींवरून सत्ताधारी आणि विरोधकांत खडाजंगी

Share

विधानसभा अधिवेशनामध्ये ‘जलजीवन मिशन’ (JJM) योजनेच्या अंमलबजावणीतील त्रुटींवरून रायबागचे आमदार दुर्योधन ऐहोळे यांनी सरकारला धारेवर धरले. योजना पूर्ण होऊन तीन वर्षे उलटली तरी अनेक गावांना अद्याप पाणी मिळत नसल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला असून, यावरून सभागृहात जोरदार चर्चा रंगली.

आमदार दुर्योधन ऐहोळे यांनी तारांकित प्रश्नाद्वारे जलजीवन मिशन अंतर्गत किती गावांमध्ये विंधनविहिरींना परवानगी दिली, असा सवाल उपस्थित केला. “अनेक ठिकाणी कामे पूर्ण झाली आहेत, मात्र पाईप लावूनही त्यांना तोट्या बसवलेल्या नाहीत. बोअरवेल खोदल्या आहेत पण त्यातून पाणी येत नाही. निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या कंत्राटदारांवर आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करून पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करावा,” अशी मागणी दुर्योधन ऐहोळे यांनी केली. यावेळी इतर अनेक आमदारांनीही त्यांच्या मागणीला पाठिंबा दिला.

या तक्रारींवर प्रत्युत्तर देताना ग्रामविकास मंत्री प्रियांक खर्गे यांनी स्पष्ट केले की, पाण्याचा स्रोत उपलब्ध असल्याशिवाय कोणतीही योजना मंजूर केली जात नाही. काही ठिकाणी भूगर्भातील पाणीपातळी घटल्याने पाण्याची समस्या उद्भवली असण्याची शक्यता आहे. ज्या ठिकाणी यंत्रणा नादुरुस्त आहे किंवा तांत्रिक अडचणी आहेत, त्यांची वरिष्ठ स्तरावरून चौकशी करून तातडीने मार्ग काढला जाईल, असे आश्वासन प्रियांक खर्गे यांनी दिले. तसेच या कामांच्या दुरुस्तीसाठी १६ कोटी रुपयांचा निधी आधीच मंजूर करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

Tags: