State

गॅस दरवाढीवरून डी.के. शिवकुमार यांचा भाजपवर हल्लाबोल; ६० रुपयांच्या वाढीवरून केंद्र सरकारला घेरले

Share

केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात ६० रुपयांनी वाढ केल्याने उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी संताप व्यक्त केला असून भाजप खासदारांनी आता या महागाईवर तोंड उघडावे, असे आव्हान दिले आहे. या दरवाढीचा फटका कोट्यवधी महिलांसह हॉटेल व्यावसायिकांना बसल्याचे त्यांनी नमूद केले.

आंतरराष्ट्रीय महिला दिनीच केंद्र सरकारने गॅस सिलिंडरच्या दरात ६० रुपयांची वाढ केली आहे. प्रत्येक विषयावर विचित्र पद्धतीने आवाज उठवणाऱ्या भाजप खासदारांनी आता या दरवाढीवरही बोलावे, अशा शब्दांत डी.के. शिवकुमार यांनी भाजपवर निशाणा साधला.

सदाशिवनगरमधील निवासस्थानाबाहेर मंगळवारी माध्यमांशी बोलताना त्यांनी केंद्र सरकारच्या अपयशावर बोट ठेवले. गॅस दरवाढीच्या मुद्द्यावर चर्चा करायला केंद्र सरकार का घाबरत आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. संसदेत या विषयावर चर्चा करण्यासाठी अद्याप संधी दिली जात नाही, म्हणूनच ‘इंडिया’ आघाडीचे प्रतिनिधी निदर्शने करत असल्याची प्रतिक्रिया डी.के. शिवकुमार यांनी दिली.

या दरवाढीमुळे हॉटेल आणि इतर छोटे उद्योग अडचणीत आले असून याविरोधात आवाज उठवणे आमचे कर्तव्य आहे. कोट्यवधी महिलांवर याचा थेट परिणाम झाला असून युद्धजन्य परिस्थितीमुळे आखाती देशांतील भारतीय उद्योजक आणि कामगारांवरही याचा परिणाम झाल्याचे डी.के. शिवकुमार यांनी सांगितले.

केंद्रीय मंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी संसदेत स्वतः काय काम केले हे सांगावे, आमच्या काळातील कामे सांगायला मी समर्थ आहे. या वयात त्यांना त्रास होईल असे मी काही बोलणार नाही किंवा त्यांच्यावर वैयक्तिक टीका करणार नाही, असे डी.के. शिवकुमार यांनी म्हटले.

Tags: