भाजपची ही राज्य कार्यकारिणी केवळ एक संघटनात्मक बैठक नसून ते एक ‘आत्ममंथन’ आहे, अशी भावना केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी व्यक्त केली.


बेंगळुरू येथील पॅलेस ग्राऊंडवरील गायत्री ग्रँड येथे आयोजित भाजप राज्य कार्यकारिणीच्या बैठकीचे उद्घाटन करताना शेखावत बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताची विचारधारा घराघरात पोहोचवण्याची आणि भ्रष्ट सरकारला सत्तेतून खाली खेचून पुन्हा सत्ता मिळवण्याचा संकल्प करण्याची ही वेळ आहे, असे त्यांनी नमूद केले.
माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या योगदानामुळे २०२८ मध्ये भाजप पूर्ण बहुमताने सत्तेत येईल, असा विश्वास गजेंद्रसिंह शेखावत यांनी व्यक्त केला. काँग्रेसमधील अंतर्गत कलह जनतेचा अपमान असून गॅरंटी योजनांमुळे राज्यावर कर्जाचा डोंगर वाढल्याची टीका त्यांनी केली. कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे अपयश घराघरात पोहोचवून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला मजबूत करावे, असे आवाहन शेखावत यांनी केले.
यावेळी बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र म्हणाले की, पंतप्रधान मोदींच्या २०४७ च्या विकसित भारताच्या संकल्पाला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेला अर्थसंकल्प मोठी बळकटी देणारा आहे. ‘सबका साथ, सबका विकास’ या मंत्राद्वारे युवा आणि महिला शक्तीला केंद्रस्थानी ठेवले आहे. युपीए सरकारच्या काळात भारताची ओळख पुसट झाली होती, मात्र आता मोदींच्या नेतृत्वाखाली भारत जगातील चौथी मोठी आर्थिक शक्ती म्हणून उदयाला आला आहे, असे त्यांनी सांगितले.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र होते. यावेळी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, शोभा करंदलाजे, व्ही. सोमण्णा, विधानसभेचे विरोधी पक्षनेते आर. अशोक, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते छळवादी नारायणस्वामी, प्रभारी राधा मोहन दास अग्रवाल, सह-प्रभारी पी. सुधाकर रेड्डी, माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा, डी. व्ही. सदानंद गौडा, जगदीश शेट्टर, माजी उपमुख्यमंत्री गोविंद कारजोळ, डॉ. सी. एन. अश्वथ नारायण, नलीन कुमार कटील यांच्यासह खासदार आणि आमदार उपस्थित होते.


Recent Comments