State

काँग्रेस आमदारांसाठी गोव्यात ४० खोल्यांचे बुकिंग

Share

राज्यात पुन्हा एकदा ‘रिसॉर्ट पॉलिटिक्स’ सुरू झाले असून काँग्रेस आमदारांसाठी गोव्यात ४० खोल्या बुक करण्यात आल्याचा खळबळजनक आरोप भाजप आमदार अभय पाटील यांनी केला आहे.

काँग्रेसमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आल्याने ही परिस्थिती निर्माण झाली असून, आता सिद्धरामय्या सरकार गोव्यातून किंवा परदेशातून चालेल अशी खोचक टीका त्यांनी केली. आपल्याकडे असलेल्या पक्क्या माहितीच्या आधारे आपण हे विधान करत असल्याचे अभय पाटील यांनी म्हटले.
​राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पाणीटंचाई निर्माण झाली असून रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार रखडले असून उत्तर कर्नाटकात भीषण परिस्थिती असताना सत्ताधारी मात्र आपापसातील भांडणे सोडवण्यात आणि मोजमजेत मग्न असल्याची टीका अभय पाटील यांनी केली.
​आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याची अबकारी विभागात बदली करण्याच्या सरकारच्या निर्णयावर त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांचा हा कारभार अत्यंत चुकीचा असून अशा अनाकलनीय बदल्यांमुळे प्रशासकीय घडी विस्कटली असल्याचा आरोप त्यांनी केला. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच इतका भ्रष्ट आणि विस्कळीत कारभार पाहायला मिळत असून भ्रष्टाचारात काँग्रेस गिनीज बुकमध्ये नाव नोंदवू शकते, अशा शब्दांत अभय पाटील यांनी नाराजी व्यक्त केली.

Tags: