हुक्केरी तालुक्यातील कुरणी परिसरात बनावट कागदपत्रे तयार करून दुसऱ्याची जमीन हडपण्याच्या प्रकरणात हुक्केरीचे उपनिबंधक आणि एका टोळीतील मुख्य आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात बनावट कागदपत्रे आणि साहित्य जप्त केले आहे.

शिवानंद मारुती कुद्दुरी रा. कुरणी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा आणि आरोपींचा कोणताही संबंध नसताना जमिनीचे बनावट दस्तऐवज तयार करण्यात आले. आरोपींनी उपनिबंधक कार्यालयातील अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करून शिवानंद आणि त्यांच्या नातेवाईकांच्या जमिनी हडपण्यासाठी बनावट फोटो आणि सह्यांचा वापर केला. जमीन गट क्रमांक १८९/४, १८३/३०ब आणि १८३/१३९ या जमिनींबाबत हे बनावट करारपत्रे तयार करण्यात आली होती.
पोलिसांनी नीलकंठ मुदपाकी याच्या घरावर छापा टाकला असता, तिथे ९ बनावट आधार कार्डे, ३ बनावट पॅनकार्ड आणि बनावट मतदार ओळखपत्र असे एकूण १३ बनावट दस्तऐवज सापडले. तसेच अशोक सूर्यवंशी याच्या फोटो स्टुडिओतून बनावट कागदपत्रे तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे संगणक, लॅपटॉप, कॅमेरा आणि प्रिंटर असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार असलेले हुक्केरीचे उपनिबंधक मडीवाळय्या बानीमठ आणि आनंद दड्डीमणी यांनी अटकपूर्व जामीन मिळवून पोलीस ठाण्यात हजेरी लावली आहे. तर नीलकंठ मुदपाकी, विजय मठद आणि अशोक सूर्यवंशी या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. या रॅकेटचा पर्दाफाश केल्याची माहिती पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी पत्रकार परिषदेत दिली.


Recent Comments