खानापूर तालुक्यातील नंदगड येथे अचानक लागलेल्या आगीत एका शेतकऱ्याने साठवून ठेवलेली सुमारे तीन ट्रॅक्टर गवतगंजी जळून खाक झाली आहे. या आगीत शेतकरी सीताराम अष्टेकर यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले असून, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

नंदगड गावातील प्रभाग ३ मध्ये ही घटना घडली. धरण रस्त्यावर असलेल्या सीताराम अष्टेकर यांच्या घराशेजारीच गवताची मोठी गंजी रचून ठेवली होती. अचानक या गवतगंजीला आग लागली आणि वाळलेला चारा असल्याने आगीने भीषण रूप धारण केले. ही आग इतकी जोरात होती की शेजारीच असलेल्या शंकर अष्टेकर यांच्या घरालाही त्याची झळ बसण्याची भीती निर्माण झाली होती. मात्र, आग लागल्याचे समजताच गावातील तरुणांनी आणि नागरिकांनी धाव घेत पाणी मारून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.
यावेळी हेस्कॉमच्या लाईनमॅनने तत्काळ वीज पुरवठा खंडित केल्यामुळे मोठी वीज दुर्घटना टळली. डोळ्यादेखत वर्षभराचा चारा जळून खाक झाल्याने शेतकरी अष्टेकर हवालदिल झाले आहेत. प्रशासनाने या घटनेचा त्वरित पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्याला आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.


Recent Comments