hubbali

हुबळीत निकृष्ट रस्ते कामावरून नागरिकांनी नगरसेवकांना धरले धारेवर

Share

हुबळीत रस्ते कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचा आरोप करत संतप्त नागरिकांनी नगरसेवकांना भररस्त्यात जाब विचारल्याची घटना घडली आहे. निकृष्ट साहित्य वापरून काम केले जात असल्याचे लक्षात येताच नागरिकांनी कामाची मोजमापे घेत लोकप्रतिनिधींना धारेवर धरले.

हुबळीतील वॉर्ड क्रमांक ३९ अंतर्गत येणाऱ्या सागर कॉलनीमध्ये सध्या रस्ते डांबरीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. संतप्त रहिवाशांनी थेट नगरसेविका आणि संबंधित अधिकाऱ्यांसमोर रस्त्याच्या थराचे मोजमाप करून दाखवले आणि निकृष्ट कामाबद्दल तीव्र संताप व्यक्त केला.

केवळ निवडणुका जवळ आल्या की नगरसेवक प्रभागात येतात, मात्र कामाच्या दर्जाकडे त्यांचे अजिबात लक्ष नसते, अशा शब्दांत नागरिकांनी लोकप्रतिनिधींना सुनावले. ‘कामे नीट होणार नसतील तर करू नका, पण लोकांची दिशाभूल थांबवा’ अशी मागणी रहिवाशांनी यावेळी केली. भररस्त्यात झालेल्या या वादामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Tags: