State

बडाल अंकलगीत वृक्षतोडीचे महाभयंकर थैमान

Share

सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याच्या नावाखाली बेळगाव तालुक्यातील बडाल अंकलगी येथे लाखो झाडांची बेकायदेशीर कत्तल करण्यात आली आहे. पर्यावरणाच्या या गंभीर ऱ्हासाविरोधात विधानपरिषद सदस्य नागराज यादव यांनी सभागृहात तारांकित प्रश्न उपस्थित करून सरकारचे लक्ष वेधले.

बेळगाव तालुक्यातील बडाल अंकलगी गावातील कौरी गु़ड्डा परिसरात सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याच्या बहाण्याने मोठ्या प्रमाणावर जंगलतोड करण्यात आली आहे. वनविभागाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता, सुमारे ५० एकरपेक्षा जास्त क्षेत्रातील लाखो झाडे बेकायदेशीरपणे जमीनदोस्त करण्यात आली आहेत. यामध्ये मौल्यवान चंदन आणि इतर दुर्मिळ वृक्षांचाही समावेश असल्याने निसर्गप्रेमींनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. या अवैध कृत्यामुळे वन्यजीवांचे आश्रयस्थान पूर्णपणे नष्ट झाले असून पर्यावरणाचा समतोल धोक्यात आला आहे.

हा मुद्दा विधानपरिषदेत मांडताना नागराज यादव यांनी अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. इतक्या मोठ्या प्रमाणावर वृक्षांची कत्तल होत असताना संबंधित अधिकारी डोळे मिटून का बसले होते, असा संतप्त सवाल त्यांनी केला. या प्रकरणातील दोषींवर तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करावी आणि वनसंपत्तीचे संरक्षण करण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी नागराज यादव यांनी केली.

Tags: