आरएसएस सरसंघचालक मोहन भागवत यांनी ‘भारत हे हिंदू राष्ट्र असून त्याला कोणत्याही मान्यतेची गरज नाही’ असे जे विधान केले आहे, ते पूर्णपणे सत्य आहे आणि त्यात शंकेला जागा नाही, अशी प्रतिक्रिया खासदार जगदीश शेट्टर यांनी व्यक्त केली.
हुबळी येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शेट्टर म्हणाले की, भारत देशात हिंदू बहुसंख्य आहेत. अधिकृतपणे हिंदू राष्ट्र असे संबोधिले जात नसले तरी, जगात भारताची ओळख हिंदू राष्ट्र म्हणूनच आहे. फाळणीच्या वेळी महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांनी ठाम भूमिका घेऊन देश विभागणी रोखायला हवी होती. ब्रिटिशांनी ‘फोडा आणि राज्य करा’ या नीतीचा वापर करून भारत आणि पाकिस्तान अशी फाळणी केली. त्यावेळी महात्मा गांधींनी ‘फाळणी माझ्या प्रेतावर होईल’ असे म्हटले होते. जर फाळणीच्या वेळी भारतातील सर्व मुस्लिमांना पाकिस्तानात आणि पाकिस्तानातील हिंदूंना भारतात पाठवले असते, तर आज कोणतेही प्रश्न उरले नसते, असे खासदार जगदीश शेट्टर यांनी म्हटले.
काँग्रेसकडून राज्यपालांचा अपमान होत असल्याच्या प्रकरणावर बोलताना त्यांनी संताप व्यक्त केला. राज्यपाल कोणतेही असंवैधानिक काम करत नसून ते राज्यघटनेनुसारच कार्यरत आहेत. त्यांनी सरकारचे अभिभाषण वाचले, ज्यातील पहिले आणि शेवटचे पान वाचून त्यांनी कर्तव्य पार पाडले. राज्यपालांवर हात उगारणे किंवा त्यांचा अपमान करणे चुकीचे आहे. बी. के. हरिप्रसाद यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी जबाबदारीने वागायला हवे, असे खासदार जगदीश शेट्टर यांनी म्हटले.


Recent Comments