NANDAGAD

रायण्णा संग्रहालयात उद्घाटनापूर्वीच महिला अधिकाऱ्याची पार्टी

Share

खानापूर तालुक्यातील क्रांतिवीर संगोळी रायण्णा संग्रहालयाचे अद्याप मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालेले नाही. असे असतानाही एका सरकारी महिला अधिकाऱ्याने सर्व नियम धाब्यावर बसवून या वास्तूच्या परिसरात संक्रांतीचा सण साजरा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

या संग्रहालयाचे १९ जानेवारी रोजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते लोकार्पण होणार असून सुरक्षेच्या कारणास्तव सध्या येथे सर्वसामान्यांना प्रवेशबंदी आहे. मात्र, खानापूर तालुका पंचायतीच्या मनरेगा योजनेच्या सहाय्यक संचालक रूपा बडकुंद्री यांनी संक्रांतीच्या सुटीच्या दिवशी आपल्या कुटुंबासह सरकारी वाहनातून या ठिकाणी हजेरी लावली आणि भोजनाचा आस्वाद घेतला. सुटीच्या दिवशी नियमाबाह्य पद्धतीने खासगी कामासाठी सरकारी गाडीचा वापर केल्याने जनतेतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन करण्यापूर्वीच आणि बंदी असलेल्या ठिकाणी अधिकाराचा गैरवापर करून प्रवेश मिळवणे कितपत योग्य आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. यासंदर्भात वाहनचालकाला विचारणा केली असता, अधिकारी आणि त्यांचे कुटुंबीय आले असल्याचे सांगत त्याने उडवाउडवीची उत्तरे देऊन काढता पाय घेतला.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होण्यापूर्वीच सरकारी अधिकाऱ्यांनी नियम मोडून सुटीच्या दिवशी अशा प्रकारे मौजमजा करणे अत्यंत निषेधार्ह असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे. तसेच तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी मेत्री यांनी या प्रकरणावर स्पष्टीकरण द्यावे, अशी आग्रही मागणीही जनतेने केली आहे. या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन आता कोणती कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Tags: