जुनी हुबळीतील शिवशंकर कॉलनीमध्ये सख्ख्या भावानेच आपल्या मोठ्या भावावर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या हल्ल्यात मल्लेश पुजारी (४२) हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, मल्लेश आणि त्याचा भाऊ प्रदीप यांच्यात जुना वाद होता. घटनेच्या वेळी मल्लेश घरासमोर बसला असताना प्रदीप तिथे आला. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या प्रदीपने जुन्या कारणावरून मल्लेशशी वाद घालण्यास सुरुवात केली. हा वाद इतका विकोपाला गेला की, प्रदीपने आपल्याजवळील चाकूने मल्लेशवर एकामागून एक सात वार केले आणि तिथून पळ काढला.
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मल्लेशला नातेवाईकांनी तातडीने हुबळीच्या किम्स रुग्णालयात दाखल केले. तिथे त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी जुना हुबळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी प्रदीपच्या अटकेसाठी पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे. कौटुंबिक वादातून झालेल्या या हिंसक घटनेमुळे परिसरात घबराट पसरली आहे.


Recent Comments