बेळगाव येथील बसवण कुडची ग्रामस्थ आणि श्री रेणुका यल्लम्मा देवीचे भक्त शाकंभरी पौर्णिमेच्या निमित्ताने सवदत्ती डोंगराकडे रवाना झाले आहेत. या यात्रेचे भाविकांमध्ये विशेष महत्त्व असून मोठ्या भक्तीभावाने बसवण कुडची येथील भाविक मातेच्या दर्शनासाठी निघाले आहेत.

बेळगावच्या बसवण कुडची गावात सवदत्ती श्री रेणुका देवीचे असंख्य भक्त आहेत. रेणुका देवीच्या वार्षिक उत्सवात अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी ही पौर्णिमा साजरी करण्यासाठी गावातून सुमारे ५५ वाहनांमधून २५०० भाविकांनी सवदत्ती यल्लम्मा डोंगराकडे प्रयाण केले आहे. ‘उदो उदो’चा जयघोष करत आणि भंडाऱ्याची उधळण करत भाविक उत्साहात मार्गस्थ झाले आहेत.

हे सर्व भाविक काही दिवस डोंगरावर वास्तव्य करणार असून देवीच्या धार्मिक विधींमध्ये आणि परंपरेनुसार पार पडणाऱ्या चुडी पौर्णिमेच्या सोहळ्यात सहभागी होतील. डोंगरावर देवीची ओटी भरल्यानंतर सर्व भक्त आपल्या गावी परतणार असून, त्यानंतर गावातही देवीचा धार्मिक सोहळा संपन्न होणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे.


Recent Comments