बस्सापूर गावात छतावरून पडून मृत्यू झाल्याचा बनाव रचून रचलेले खुनाचे कारस्थान उघडकीस आणण्यात सीपीआय जावेद मुशापुरे यांच्या पथकाला यश आले आहे. आईने दिलेल्या माहितीमुळे प्रकरणाला नाट्यमय कलाटणी मिळाली असून पोलिसांनी आरोपी भावाला अटक केली आहे.

बस्सापूर येथील सिद्धप्पा विठ्ठल रामापुरे आणि बसलिंग विठ्ठल रामापुरे या दोन भावांमध्ये ४ एकर जमिनीच्या वाटणीवरून जुना वाद होता. घटनेच्या दिवशी बसलिंग याने दारूच्या नशेत जमिनीच्या वाटणीसाठी वाद घातला असता, चिडलेल्या सिद्धप्पाने लाकडी दांडक्याने त्याला बेदम मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता सिद्धप्पाने बसलिंगच्या डोक्यावर दगड घातल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यानंतर सिद्धप्पाने बसलिंगची पत्नी वीणा हिला जीवे मारण्याची आणि मालमत्तेत वाटा न देण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या वीणाने पती छतावरून पडून मेल्याची खोटी माहिती पोलिसांना दिली होती, ज्यावरून १८ डिसेंबर रोजी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती.
मात्र, परिसरात या संशयास्पद मृत्यूबाबत दबक्या आवाजात चर्चा सुरू असल्याने सीपीआय जावेद मुशापुरे यांनी प्रकरणाचा सखोल तपास हाती घेतला. तपासादरम्यान पोलिसांनी मृत बसलिंगची आई रत्नाव्वा यांची विश्वासात घेऊन चौकशी केली असता, त्यांनी हत्येची खरी हकीकत पोलिसांना सांगितली. आईच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपी सिद्धप्पाला जेरबंद केले आहे. अत्यंत चातुर्याने हा खुनाचा गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल पोलीस अधिकारी जावेद मुशापुरे आणि त्यांच्या पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.


Recent Comments