खानापूर तालुका कृषी समाज, कृषी विभाग, कृषी संलग्न विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने खानापूर येथील तालुका पंचायत सभागृहात तालुकास्तरीय शेतकरी दिन आणि चर्चासत्र कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


या कार्यक्रमाचे उद्घाटन कृषी समाजाचे राज्य प्रतिनिधी बाळप्पा बेलकूड यांनी केले. शेतकऱ्यांनी अधिक उत्पादन मिळवण्यासाठी माती आणि जमिनीच्या सुपीकतेची तपासणी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. गो-पालन करून पारंपरिक पद्धतीने शेती करावी यावर त्यांनी भर दिला. बेळगाव जिल्ह्याचे नगदी पीक असलेल्या ऊसाच्या जोमदार वाढीसाठी १६ प्रकारच्या खतांची गरज असते. यामध्ये हवा, प्रकाश, पाणी आणि जमिनीच्या सत्वामध्येच अर्धी खते सामावलेली असतात. उर्वरित सूक्ष्म पोषक तत्वे आणि सेंद्रिय खतांचा वापर केल्यास उत्तम उत्पादन घेणे शक्य आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
या कार्यक्रमाला कृषी समाजाचे जिल्हाध्यक्ष शंकरगौडा पाटील, तालुका घटक अध्यक्ष कोमल जिनगोंडा, जिल्हा प्रतिनिधी कृष्णाजी पाटील, सहाय्यक कृषी संचालक सतीश माविनकोप्प, वरिष्ठ सहाय्यक उद्यानविद्या संचालक किरण उपाळे, कृषी समाजाचे ज्योतिबा रेमाणी, विजय कामत, रमेश पाटील यांच्यासह शेतकरी, शेतकरी नेते आणि विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उद्यानविद्या शास्त्रज्ञ के.टी. पाटील आणि कृषी विद्यापीठाच्या प्राध्यापिका नमिता राऊत यांनी यावेळी मार्गदर्शनपर व्याख्यान दिले.
या प्रसंगी शेती क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तालुक्यातील श्रीनाथ हनुमंत नाईक, शिवाजी मादार, केदारी बडीगेर आणि मक्तूमसाब पाटील यांचा कृषी समाजाच्या वतीने ‘आदर्श शेतकरी’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.


Recent Comments