Khanapur

काम पूर्ण होण्यापूर्वीच बेळगाव-पणजी महामार्गावर अवजड वाहतूक सुरू

Share

बेळगाव-पणजी महामार्गाचे काम पूर्ण होण्यापूर्वीच या मार्गावर अवजड वाहनांची मोठी वर्दळ सुरू झाली असून, याबाबत स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. लोंढा फाटा परिसरातील रस्त्याचे काम अद्याप सुरू असतानाच वाहनांची वर्दळ वाढल्याने चिंतेचे वातावरण आहे.

गेल्या ५ वर्षांपासून लोंढा फाटा ते रेल्वे स्थानकाकडे जाणारा रस्ता महामार्गाच्या कामामुळे अत्यंत धोकादायक बनला होता. या रस्त्याच्या उजव्या बाजूला लोंढा हायस्कूल आणि इंदिरा विद्यालय या शाळा असून, विद्यार्थ्यांना याच मार्गाने शाळेत जावे लागते. नवीन महामार्ग तयार झाल्यापासून वाहने भरधाव वेगाने धावत आहेत. ही बाब लक्षात घेऊन सोमवारी सकाळी लोंढा फाटा येथे डांबरीकरण कामाला सुरुवात करण्यात आली.

लोंढा ग्रामपंचायतीचे अध्यक्ष नीळकंठ उसपकर यांनी पूजा करून या रस्ते कामाचा शुभारंभ केला. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने हे डांबरीकरण करण्यात येत आहे. याप्रसंगी सुरेश देसाई, बाबुराव देसाई, चिमणराव बाणेकर यांच्यासह पंचायत सदस्य आणि लोंढा पोलीस ठाण्याचे मुल्ला उपस्थित होते. रस्त्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याने प्रवासी आणि वाहनधारकांनी समाधान व्यक्त केले आहे. यापूर्वी रस्ता खराब असल्याने बस स्थानकापर्यंत जात नव्हती, प्रवाशांना लोंढा फाट्यावरच उतरवले जात असे. आता रस्ता दुरुस्त होत असल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण होण्यापूर्वीच या मार्गावरून जड वाहनांची वाहतूक सुरू झाली आहे. यामुळे रस्ता पुन्हा खराब झाला तर त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. तसेच, रस्ता गुळगुळीत झाल्याने वाहनांचा वेग वाढणार आहे. त्यामुळे हायस्कूल आणि फाट्याजवळ तातडीने गतिरोधक बसवावेत आणि सूचना फलक लावावेत, अशी मागणी सार्वजनिक स्तरावरून करण्यात आली आहे.

Tags: