बेळगावमध्ये नव्या वर्षाच्या स्वागतासाठी पोलीस प्रशासनाकडून नियमावली जाहीर करण्यात आली असून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिला आहे.

बेळगाव शहरात नवीन वर्षाच्या स्वागतावेळी शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी कडक नियमावली जाहीर केली असून घातक शस्त्रे बाळगणे, ड्रिंक अँड ड्राईव्ह आणि अमली पदार्थांच्या सेवनावर पूर्णपणे बंदी घातली आहे. विशेषतः महिलांची छेडछाड करणाऱ्यांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार असून, मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांना १० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येईल. शहरात सुमारे १००० पोलीस कर्मचारी, केएसआरपी आणि होमगार्डच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या असून मदतीसाठी २० विशेष हेल्प डेस्कची स्थापना करण्यात आली आहे.
पोलीस आयुक्तांनी हॉटेल मालकांना अल्पवयीन मुलांना मद्य विक्री न करण्याच्या आणि रात्री १ वाजेपर्यंतच बार सुरू ठेवण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. शहरातील ‘ओल्ड मॅन’ दहन कार्यक्रमांसाठी अग्निशमन दलाची परवानगी अनिवार्य असून सार्वजनिक ठिकाणी अनुचित प्रकार रोखण्यासाठी पोलिसांनी चोख नियोजन केले आहे. अमली पदार्थांची विक्री किंवा सेवन करणाऱ्यांवर पोलिसांची विशेष नजर असेल, असे स्पष्ट करत नागरिकांनी नियमांचे पालन करून सुरक्षितपणे नवीन वर्षाचे स्वागत करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
बेळगावात नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी नागरिक सज्ज झाले असून, विशेषतः कॅम्प परिसरातील ‘ओल्ड मॅन’ दहनाच्या परंपरेने बाजारपेठेत मोठी रंगत आणली आहे. या प्रतिकृतींना दरवर्षी मागणी वाढत असून, स्थानिक नागरिकांसह शेजारील गोवा राज्यातूनही लोक या खरेदीसाठी बेळगावात दाखल होत आहेत. प्रत्येक प्रतिकृतीच्या रचनेनुसार त्यांचे दर निश्चित करण्यात आले असून, रात्री १२ वाजता यांचे दहन करून बेळगावकर आगळ्यावेगळ्या पद्धतीने नवीन वर्षात पदार्पण करणार आहेत.
दुसरीकडे, या सेलिब्रेशन दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी बेळगाव पोलीस विभागाने कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. शहराच्या कानाकोपऱ्यात गस्त वाढवण्यात आली असून नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली.


Recent Comments