“जगभरात भारतीयांच्या नेतृत्व, कर्तृत्व आणि मातृत्वाला जी मान्यता मिळते, त्यामागे आपली ‘भावनाप्रधानता’ हेच मोठे कारण आहे,” असे प्रतिपादन हुक्केरी हिरेमठाचे चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी यांनी केले.


चिक्कोडी तालुक्यातील एकसंबा येथे जोल्ले ग्रुपच्या वतीने आयोजित ‘प्रेरणा उत्सवात’ २०२५ सालचा प्रेरणा पुरस्कार प्रदान करताना ते बोलत होते.
आशाज्योती मतिमंद मुलांच्या निवासी शाळेचे अध्यक्ष ज्योतीप्रसाद जोल्ले यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी हा सोहळा आयोजित केला जातो. यावर्षीचा ५१ हजार रुपये रोख आणि मानचिन्ह असलेला मुख्य ‘प्रेरणा पुरस्कार’ नवी दिल्ली येथील ‘चयनीत फाउंडेशन’च्या दिव्यांग मुलांच्या बँड पथकाला देण्यात आला. या पथकातील चयना तनिजा, ईशान प्रतापसिंग, केविन मिशेल, श्रेयम श्रीवर्धन, श्रेयम चक्रवर्ती आणि प्रशिक्षक संदीप पाल यांचा यावेळी गौरव करण्यात आला.
आमदार शशिकला जोल्ले यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “विशेष मुलांचे दुःख समजून घेण्यासाठी मातृत्वाची जोड हवी. अशा मुलांकडे दुर्लक्ष न करता त्यांना मायेने सांभळले पाहिजे.”
यावेळी विविध क्षेत्रांतील १० मान्यवरांना प्रत्येकी ११ हजार रुपये आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यामध्ये सहकार क्षेत्रातील राजेंद्र पाटील, कृषी क्षेत्रातील सुरेश पाटील, सांस्कृतिक क्षेत्रातील श्रेयल शहा, शिक्षण क्षेत्रातील युवराज पाटील, समाजसेवेसाठी निजप्पा हिरेमनी, युवा मान्यवर श्रीधर माळगी, अध्यात्म क्षेत्रातील गुरुदेवी हुलेप्पनवरमठ, क्रीडा क्षेत्रातील महेश अंगडी आणि पत्रकारिता क्षेत्रातील सुभाष दलाल यांचा समावेश आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जोल्ले ग्रुपचे उपाध्यक्ष बसवप्रसाद जोल्ले यांनी केले. यावेळी व्यासपीठावर जोल्ले ग्रुपचे अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले, निपाणीचे प्राणलिंग स्वामीजी, संकेश्वरचे विद्यानरसिंह भारती स्वामीजी, परमानंदवाडीचे अभिनव ब्रह्मानंद स्वामीजी, माजी मंत्री शशिकांत नाईक, ज्योतीप्रसाद जोल्ले, प्रिया जोल्ले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments