Delhi

बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांची खासदार इराण्णा कडाडींकडून पाठराखण

Share

महाराष्ट्र खासदार धैर्यशील माने यांनी बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांविरुद्ध केलेल्या हक्कभंग तक्रारीच्या पार्श्वभूमीवर, राज्यसभा खासदार इराण्णा कडाडी यांनी आज नवी दिल्लीत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली.

बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी कोणत्याही खासदाराच्या विशेषाधिकाराचे उल्लंघन केलेले नाही, तर केवळ शांतता राखण्यासाठी कायदेशीर पाऊल उचलले आहे, अशी भूमिका कडाडी यांनी मांडली.

सोमवारी नवी दिल्लीत प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती देताना कडाडी म्हणाले की, बेळगाव जिल्हा कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा या तीन राज्यांच्या सीमेवर असून येथे सर्व भाषिक गुण्यागोविंदाने राहतात. मात्र, १ नोव्हेंबर रोजी ‘काळा दिन’ आणि हिवाळी अधिवेशनादरम्यान काही संघटना चिथावणीखोर भाषणे देऊन वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करतात असा उलट आरोप खासदार इराण्णा कडाडींनि केला असून अशा परिस्थितीत सर्व नागरिकांचे हित जपणे हे जिल्हा प्रशासनाचे प्रथम कर्तव्य असते असा मुद्दा मांडला आहे.

खासदार धैर्यशील माने यांना बेळगावात येण्यापासून रोखणे हा हक्कभंग नसून, जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी घेतलेला घटनात्मक निर्णय होता. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करणे हे अत्यंत चुकीचे असल्याचेही कडाडी म्हणाले.

खासदार कडाडी यांच्या निवेदनावर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी धैर्यशील माने यांनी तक्रार केली असली तरी मी कोणताही एकतर्फी निर्णय घेणार नाही. या घटनेची पार्श्वभूमी तपासून पाहिली जाईल, असे आश्वासन बिर्ला यांनी दिल्याचे कडाडी यांनी सांगितले.

Tags: