Belagavi

हक्काच्या जमिनीसाठी कणबर्गीचे शेतकरी रस्त्यावर

Share

बेळगाव विकास प्राधिकरणाने कणबर्गी येथील ६० एकर १८ गुंठा सुपीक जमीन शेतकऱ्यांच्या संमतीविना बळकावली आहे. ही जमीन ७ दिवसांत परत न केल्यास ‘गुर्लापूर’च्या धर्तीवर उग्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

या संदर्भात शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज ‘बुडा’ आयुक्तांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. कणबर्गी येथील स्कीम नंबर ६१ अंतर्गत येणारी सुपीक जमीन प्राधिकरणाने बेकायदेशीरपणे ताब्यात घेतली असून, सरकारी कागदपत्रांवरून शेतकऱ्यांची नावे परस्पर हटवण्यात आली आहेत. याच जमिनींबाबत भूमाफियांना ‘एनओसी’ देऊन अधिकारी मनमानी कारभार करत असल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे.

अनेक शेतकऱ्यांनी या प्रकरणाबाबत न्यायालयात धाव घेतली असतानाही प्रशासनाने खात्यांमध्ये बदल करून न्यायालयाचा अवमान केला आहे. “जमीन ताब्यात घेताना योग्य मोबदला दिलेला नाही आणि मंत्र्यांकडे दाद मागितली असता त्यांनी ही जमीन पडीक असल्याचे सांगून दिशाभूल केली आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया प्रकाश नाईक यांनी व्यक्त केली आहे.

यावेळी संजू इनामदार, बबन मालायी, केदारी गोवेकर, कुमार पाटील, अल्ताब मुल्ला यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते. प्रशासनाने ७ दिवसांत निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला आहे.

Tags: