बेळगाव तालुक्यातील काकती येथील सिद्धेश्वर मंदिराच्या पुजाऱ्यांनी जातिवाचक शिवीगाळ करून आपल्याला बेदम मारहाण केल्याचा गंभीर आरोप चन्नबसू हडगली या व्यक्तीने केला आहे. पुजाऱ्यांच्या जाचातून सुटका करून न्याय मिळवण्यासाठी पीडित व्यक्तीने आता पोलीस आयुक्तांकडे धाव घेतली आहे.

सोमवारी बेळगावमध्ये पत्रकारांशी बोलताना चन्नबसू हडगली यांनी आपली व्यथा मांडली. “मी सिद्धेश्वर मंदिरात सेवा करतो, मात्र तिथे असलेल्या चार-पाच पुजाऱ्यांनी माझ्या जातीचा उल्लेख करून मला अत्यंत हीन वागणूक दिली आणि बेदम मारहाण केली. मंदिरात सेवा करत असताना मला दररोज शिवीगाळ केली जाते आणि मारहाण केली जाते,” असा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे.
या मारहाणीनंतर आता आपल्याला जीवे मारण्याच्या धमक्या येत असून संपूर्ण कुटुंब भीतीखाली असल्याचे हडगली यांनी सांगितले. याप्रकरणी यापूर्वीच काकती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती, मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळेच आता या प्रकरणाची दखल घेऊन न्याय द्यावा, या मागणीसाठी त्यांनी शहराच्या पोलीस आयुक्तांकडे दाद मागितली आहे.


Recent Comments