Bailahongala

बैलहोंगलमध्ये गंगामतस्थ संघाच्या सभेत गोळीबार; शहरात तणाव

Share

बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल शहरात गंगामतस्थ संघाच्या सभेदरम्यान मोठा हायड्रामा पाहायला मिळाला. सभेतील वादाचे रूपांतर हाणामारीत झाले असून, यावेळी हवेत गोळीबार करण्यात आल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे.

संघाच्या सन २०२१ ते २०२३ या कालावधीतील अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्यांच्या निवड प्रक्रियेबाबत आधीच न्यायालयात खटला सुरू आहे. या पार्श्वभूमीवर नवीन अध्यक्षांची निवड करू नये, अशी तक्रार शिवा कोलकार आणि सचिव मल्लिकार्जुन बाजी यांनी पोलिसांत दिली होती. मात्र, ही तक्रार विचारात न घेता ज्येष्ठ नेते मल्लप्पा मुरगोड यांच्या नेतृत्वाखाली सभा सुरू असताना दोन गटांत जोरदार शाब्दिक चकमक उडाली आणि वादाचे रूपांतर हिंसाचारात झाले.

या गोंधळादरम्यान ज्येष्ठ नेते मल्लप्पा मुरगोड यांनी हवेत गोळीबार केल्याचा आरोप शिवा कोलकार यांनी केला आहे. या संघर्षात शिवा यांच्यासह तिघे जण किरकोळ जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी बैलहोंगल येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, पोलिसांच्या उपस्थितीतच हातात बंदूक धरलेली दृश्ये स्थानिकांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केली असून त्याबाबत पोलिसांत तक्रारही देण्यात आली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. बैलहोंगल पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असल्याचे त्यांनी सांगितले.

Tags: