Savadatti

मुनवळ्ळीत कॅनरा बँकेवरील दरोड्याचा मोठा डाव फसला

Share

बेळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून चोरांचा सुळसुळाट वाढला असून सवदत्ती तालुक्यातील मुनवळ्ळी शहरातील कॅनरा बँकेत दरोड्याचा प्रयत्न झाल्याने खळबळ उडाली आहे. सायरन वाजल्यामुळे चोराला रिकाम्या हाताने पळ काढावा लागल्याने मोठी लूट टळली आहे.

सवदत्ती-गोकाक मुख्य रस्त्यावर असलेल्या या बँकेत मध्यरात्री दोनच्या सुमारास एका चोराने मागील बाजूची लोखंडी खिडकी कापून आत प्रवेश केला. तोंडाला मास्क लावून आलेल्या या चोराने बँकेत लूट करण्याचा प्रयत्न करताच धोक्याची घंटा वाजली. सायरनच्या आवाजामुळे तो चोर घाबरला आणि त्याने तातडीने तिथून पळ काढला. यामुळे बँकेतील लाखो रुपयांची रोकड आणि मौल्यवान ऐवज दरोड्यापासून थोडक्यात वाचल्याचे दिसून येत आहे.

या घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी चिदंबर मडीवाळर, सीपीआय सुरेश बेंडेगुंबळ आणि सवदत्ती पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तपासासाठी श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोराचा माग काढला जात आहे. या प्रकरणी सवदत्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पसार झालेल्या चोराचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबवत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Tags: