देव-धर्म रक्षणाबरोबरच समाजकार्याला वाहून घेतलेल्या श्रीराम सेना हिंदुस्थानच्यावतीने आयोजित भव्य रक्तदान शिबिराला आज रविवारी सकाळी अनगोळ येथे उस्फुर्त प्रतिसादात प्रारंभ झाला.


अनगोळ, बेळगाव येथील राजहंस गल्ली येथे सदर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत आज सकाळी शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या शिबिरामध्ये श्रीराम सेना हिंदुस्तान च्या पदाधिकारी कार्यकर्त्यांसह अनेक रक्तदाते स्वयंस्फूर्तीने रक्तदान करताना दिसत होते. आयोजकांनी आजच्या शिबिरात जवळपास 500 जण रक्तदान करतील असा अंदाज व्यक्त केला आहे.शिबिराच्या शुभारंभानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांनी सांगितले की, श्रीराम सेना हिंदुस्तानच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षांपासून आमचे हजारो कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने रक्तदान करत आहेत. या पद्धतीने जात, धर्म, पंथ, भाषा असा कोणताही भेदभाव न करता रक्तदान करून आमच्या कार्यकर्त्यांनी असंख्य लोकांना जीवदान दिले आहे.आमचे हे रक्तदान शिबिर एक सामाजिक उपक्रम असून रक्ताची गरज असलेल्या लोकांचे प्राण वाचावेत हा या रक्तदान शिबिराचा मुख्य उद्देश आहे. दोन दिवसांपूर्वी शहरात लावण्यात आलेले आमच्या या रक्तदान शिबिराचे होर्डिंग आणि बॅनर्सची काही विघ्नसंतोषी लोकांनी नासधूस केली.त्या लोकांना मी सांगू इच्छितो रक्तदान शिबिराचा हा उपक्रम समस्त समाजाच्या हितासाठी आहे. तेंव्हा त्यामध्ये जात, भाषा अशा गोष्टी कोणीही आणू नयेत, असे असे स्पष्ट करून शिबिरात रक्तदान करणारे सर्व युवक आणि रक्तदात्यांना कोंडुसकर यांनी धन्यवाद दिले.


Recent Comments