Belagavi

बेळगावच्या शेतवाडीत पाहुण्या पक्ष्यांचे आगमन

Share

हिवाळ्याचा मौसम सुरू होताच पक्ष्यांच्या स्थलांतराचा निसर्गचक्र पुन्हा एकदा अनुभवायला मिळत आहे. बेळगाव तालुक्यातील यदुइराप्पा रोड शेजारील शेतवाडी परिसरात बगळ्यासारख्या दिसणाऱ्या विविध स्थलांतरित पक्ष्यांनी हजेरी लावली असून, शेत ओळीत खाद्य टिपताना हे पक्षी मोठ्या संख्येने दिसत आहेत.
पक्षी हे सर्वाधिक स्थलांतर करणारे जीव म्हणून ओळखले जातात. तापमानातील बदल, अन्नाची उपलब्धता आणिसुरक्षित वातावरणाच्या शोधात हे पक्षी हजारो किलोमीटरचा प्रवास करत असतात. सध्या बेळगाव परिसरात वाढलेल्या थंडीमुळे बाहेरील देशांतून तसेच इतर भागांतून स्थलांतरित पक्षी येथे दाखल झाल्याचे निरीक्षण निसर्गप्रेमींनी नोंदवले आहे.विशेष म्हणजे बेळगाव परिसरात सध्या राज्यातील तुलनेने अधिक थंडी जाणवत असून, याच थंड वातावरणात शेतवाडी, ओलसर जमीन आणि नैसर्गिक अन्नसाखळीमुळे हा परिसर स्थलांतरित पक्ष्यांसाठी सुरक्षित आश्रयस्थान ठरत आहे. शेतांमधील किडे, लहान जलचर व अन्न उपलब्ध असल्याने हे पक्षी येथे स्थिरावत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

पर्यावरणीय दृष्टीने ही घटना अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन म्हणजे परिसरातील जैवविविधता टिकून असल्याचे आणि पर्यावरणीय समतोल योग्य दिशेने असल्याचे द्योतक आहे. मात्र वाढते शहरीकरण, रसायनयुक्त शेती आणि अधिवास नष्ट होण्यामुळे या पक्ष्यांच्या अस्तित्वावर भविष्यात धोका निर्माण होऊ शकतो.

निसर्ग आणि पर्यावरण जपण्यासाठी शेतवाडी परिसरातील पाणथळ जागा, झाडे आणि नैसर्गिक अधिवास संरक्षित ठेवण्याची गरज असून, नागरिकांनीही या पक्ष्यांना त्रास न देता त्यांचे संरक्षण करण्याचे आवाहन पर्यावरणप्रेमींनी केले आहे.

Tags: