भारतीय कम्युनिस्ट पक्षाने आपल्या स्थापनेची १०० वर्षे पूर्ण केली असून, त्यानिमित्त शताब्दी महोत्सवाचे दिमाखदार आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवांतर्गत वर्षभर दर आठवड्याला विविध सामाजिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती माजी महापौर ॲडव्होकेट नागेश सातेरी यांनी दिली.

भारतीय कम्युनिस्ट पक्ष आपला शताब्दी महोत्सव साजरा करत आहे. या शंभर वर्षांच्या काळात कम्युनिस्ट पक्षाने स्वातंत्र्य संग्राम, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती आंदोलन आणि बेळगाव सीमा विवादात अत्यंत सक्रिय सहभाग नोंदवला आहे. १९५५ मध्ये संयुक्त महाराष्ट्रासाठी झालेल्या पहिल्या आंदोलनाचे नेतृत्व कम्युनिस्ट पक्षानेच केले होते, ज्यामध्ये झालेल्या गोळीबारात १७ आंदोलकांना हुतात्मे पत्करावे लागले होते, अशी आठवण त्यांनी यावेळी करून दिली.
पक्षाने १९२० मध्ये कामगारांसाठी विशेष समिती स्थापन केली होती. अनेक कलाकार, नाटककार आणि चित्रपट अभिनेते कम्युनिस्ट पक्षाच्या विचारधारेतून तयार झाले आहेत. शेतकरी आणि कामगारांच्या अनेक ऐतिहासिक लढ्यांचे नेतृत्व आमच्या पक्षाने केले आहे. १९२८ मध्ये गिरणी कामगारांचे मोठे आंदोलन झाले होते. महात्मा फुले यांचे अनुयायी मेघाजी लोखंडे यांनी उपोषण सुरू केले होते आणि त्यांच्याच लढ्यामुळे आज कामगारांना साप्ताहिक सुट्टी मिळत आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने दर आठवड्याला एक विशेष कार्यक्रम आयोजित केला जाणार असून, पक्षाची विचारधारा आणि ऐतिहासिक कार्य जनसामान्यांपर्यंत पोहोचवले जाणार आहे, अशी प्रतिक्रिया माजी महापौर ॲडव्होकेट नागेश सातेरी यांनी व्यक्त केली.


Recent Comments