Belagavi

प्रभाग २९ मध्ये मद्यपींचा त्रास आणि हुल्लडबाजी; नगरसेवकांच्या नेतृत्वाखाली निवेदन

Share

प्रभाग क्रमांक २९ मधील नागरिकांनी दारूच्या नशेत होणारी बेकायदेशीर कृत्ये आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून होणाऱ्या त्रासाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. आमदार अभय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नगरसेवक नितीन जाधव यांच्या नेतृत्वाखाली प्रभागातील नागरिकांनी गुरुवारी टिळकवाडी पोलीस स्थानकाचे सीपीआय रवी पूजारे यांची भेट घेऊन गाऱ्हाणे मांडले.

प्रभागातील विविध ठिकाणी सुरू असलेल्या असामाजिक आणि बेकायदेशीर कृत्यांमुळे सर्वसामान्य नागरिक, विशेषतः महिलांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या समस्यांची सविस्तर माहिती नागरिकांनी पोलीस प्रशासनाला दिली. सीपीआय रवी पूजारे यांनी नागरिकांच्या तक्रारी गांभीर्याने ऐकून घेतल्या आणि येत्या १५ दिवसांत या समस्यांवर ठोस तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.

या संदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना नगरसेवक नितीन जाधव म्हणाले की, “नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन पोलिसांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. ज्या ठिकाणी त्रास होतो, त्या स्पॉट्सवर दररोज पोलिसांचे पेट्रोलिंग सुरू राहील, अशी ग्वाही सीपीआय यांनी दिली आहे.”

विशेष म्हणजे, प्रभागातील नागरिकांनी अशा प्रकारे संघटित होऊन स्वतः पुढाकार घेत निवेदन देण्याची बेळगावमधील ही पहिलीच वेळ ठरली आहे. यावेळी प्रभागातील नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. नागरिकांच्या या जागरूकतेबद्दल नगरसेवक जाधव यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

Tags: