बेळगाव शहराने पुन्हा एकदा मानवी मूल्ये आणि सामाजिक एकतेचे दर्शन घडवले आहे. धर्माच्या सीमा ओलांडून एका मुस्लीम कुटुंबाने गेल्या दोन दशकांपासून आपल्याकडे आश्रयाला असलेल्या हिंदू वृद्धेवर त्यांच्याच धर्माच्या परंपरेनुसार अंत्यसंस्कार करून सौहार्दाचा नवा आदर्श घालून दिला आहे.

भाग्यनगर येथील रहिवासी शांताबाई या गेल्या २० वर्षांपासून गांधीनगर येथील एका मुस्लीम कुटुंबात आश्रयाला होत्या. या कुटुंबाने शांताबाईंना आपल्या घरातील सदस्याप्रमाणेच प्रेम आणि सन्मान दिला होता. वृद्धत्वामुळे उद्भवलेल्या आजारामुळे त्यांचे बेळगावच्या सिव्हिल रुग्णालयात निधन झाले. या घटनेची माहिती मिळताच इक्बाल जकाती यांनी सामाजिक कार्यकर्ते आणि माजी महापौर विजय मोरे यांच्याशी संपर्क साधला.
विजय मोरे यांनी तातडीने हालचाली करत मृतदेह रुग्णालयातून सदाशिवनगर येथील स्मशानभूमीत नेण्याची व्यवस्था केली. विजय मोरे, ॲलन विजय मोरे, इक्बाल जकाती, निसार, शमशेर आणि संजय कोलकार यांनी स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांच्या मदतीने शांताबाई यांच्या पार्थिवावर पूर्णपणे हिंदू धर्माच्या परंपरेनुसार अंत्यसंस्कार केले. बेळगावमधील ही बंधुभावाची आणि परस्पर आदराची परंपरा सर्वसामान्यांच्या कौतुकास पात्र ठरली आहे.


Recent Comments